चिरंजीवपद (अर्थासहित) – संत एकनाथ महाराज

सार्थ चिरंजीवपद 

चिरंजीवपद पावावयासी ।
आन उपाय नाहीं साधकांसी ।
किंचित् बोलों निश्चयासी ।
कळावयासी साधकां ॥१॥

“चिरंजीवपद” म्हणजे अविनाशी व अवीट असे निरतिशय-आनंदरूप-मोक्ष सुख ! याची प्राप्ती होण्यासाठी साधकाला कोणता अधिकार लागतो. हे त्यांना समजण्यासाठी निश्चयपूर्वक थोडेसे सांगतो. ।।१।।


येथे मुख्य पाहिजे अनुताप ।
त्या अनुतापाचें कैसे रुप ।
नित्य मृत्यु लागला समीप। 
न मानी अल्प देहसुख ॥२॥

यात मुख्यतः ‘अनुताप’ (म्हणजे प्राप्त परिस्थिती अनिष्ट म्हणून तळमळ व इष्ट परिस्थितीची अनिवार ओढ) पाहिजे असतो. त्या अनुतापाचे स्वरूप काय? तर मृत्यू केव्हा उडी घालील याचा नेम नाही. असे जाणून तो देहविषयक सुखलालसा सोडून देतो. ।।२।।


म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला ।
तो म्यां विषय भोगी लाविला ।
थिता परमार्थ हातीचा गेला ।
करीं वहिला विचार ॥३॥

तो म्हणतो, देवाने हा उत्कृष्ट नरदेह दिला असता विषय सेवनाकडे मी त्याचा दुरुपयोग केला आणि हातचा परमार्थ घालवून बसलो.
असा तो विचार करतो. ।।३।।


ऐसा अनुताप लाहतां ।
तंव वैराग्य ये तयाच्या हातां ।
त्या वैराग्याची कथा ।
ऐक आतां सांगेन ॥४॥

असा अनुताप नित्य करू लागला म्हणजे त्यास ‘वैराग्य’ प्राप्त होते. त्या वैराग्याची कथा (स्वरूप) सांगतो, ऐक. ।।४।।


तें वैराग्य बहुतांपरी ।
आहे गा हें अवधारी ।
सात्त्विक राजस तामस त्रिप्रकारीं ।
योगीश्वरी बोलिजे ॥५॥

ते वैराग्य अनेक प्रकारचे असते, त्यात योगीश्वरांनी (सर्व श्रेष्ठ अनुभव जाणकारांनी) सात्विक, राजस, तामस असे तीन प्रकार सांगितले आहेत. ।।५।।


नाही वेदविधिविचार ।
नेणें सत्कर्म साचार ।
कर्मधर्मी भ्रष्टाकार ।
तो अपवित्र तामस ॥६॥

वेधविधी, आचार-विचार, सत्कर्म इत्यादी ज्याला माहीत नाही. कर्मधर्मात जो भ्रष्टाचार करतो, तो पुरुष ते वैराग्य ‘तामस’ म्हणजे अपवित्र होय. ।।६।।


त्याग केला पूज्यतेकारणें । 
सत्संग सोडूनि पूजा घेणें । 
शिष्यममता धरुनि राहणें । 
ते जाणणें राजस ॥७॥

लोकांनी आपल्या नादी लागून पूजा करावी ह्या हेतूने (बाह्यतः) त्याग करणे व सत्संग सोडून पूजा घेणे, आणि (शिष्यांकरिता आपलेपणा)धरून राहणे. हे ‘राजस’ वैराग्य समजावे. ।।७।।


वैराग्य राजस तामस । 
तें न मानेंच संतांस । 
तेणें न भेटे कृष्णपरेश । 
अनर्थास मूळ तें ॥८॥

असले राजस व तामस वैराग्य संतांना मान्य नाही. कारण त्यायोगे श्रीकृष्ण परमात्मा भेटत नाही. उलट ते अनार्थस कारण होते. ।।८।।


आतां वैराग्य शुद्धसात्त्विक । 
जें मी जगद्वंद्य मानी यदुनायक । 
तें तूं सविस्तर ऐक । 
मनीं निष्टंक बैसावया ॥९॥

आता शुद्ध सात्विक वैराग्य, जे मी यदुनायक जगतवंद्य मानतो. ते सविस्तर सांगतो. मनास नीट ठसण्याकरिता लक्ष देऊन ऐक. ।।९।।


भोगेच्छाविषयक । 
तें तों सांडी सकळिक । 
प्रारब्धें प्राप्त होतां देख । 
तेथोनि निष्टंक अंग काढी ॥१०॥

विषयाची सर्व भोगेच्छा तो टाकून देतो. प्रारब्धानुसार भोग प्राप्त झाले तरी त्यातून अंग काढून घेतो. (लिप्त होऊन राहत नाही). ।।१०।।


कां जे विषय पांच आहेती ।
ते अवश्य साधकां नाडिती । 
म्हणोनि लागो नेदी प्रीति । 
कवणे रीति ऐक पां ॥११॥

कारण, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे पाच विषय आहेत, ते साधकांना नाडतात, म्हणून त्याची प्रीती तो लावून घेत नाही. ते कसे ते सांगतो ऐक. ।।११।।


जेणें धरिला शुद्ध परमार्थ । 
त्यासि जनमान हा करी अनर्थ । 
तेणें वाढे विषयस्वार्थ । 
ऐक नेमस्त विचार हा ॥१२॥

ज्याने शुद्ध परमार्थ मार्ग धरला, त्याला जनमान (लोकांनी नावाजने) हा अनर्थ कारक आहे. कारण त्यायोगे विषय स्वार्थ वाढत असतो, तो नेमस्त ( नेमका विचार करून ठरलेला मार्ग) ऐक. ।।१२।।


वैराग्य पुरुष देखोनी । 
त्याची स्तुती करिती जनीं । 
एक सन्मानें करुनी । 
पूजे लागोनी पैं नेती ॥१३॥

विरक्त पुरुष पाहून लोक त्याची स्तुती करू लागतात, कोणी त्याला मोठ्या सन्मानाने पूजेसाठी नेतात. ।।१३।।


त्याचें वैराग्य कोमल कंटक । 
नेट न धरीच निष्टंक । 
देखोनि मानस्तुति अलोलिक । 
भुलला देख पैं तेथें ॥१४॥

त्याचे वैराग्य कोवळ्या काट्या सारखे लवचिक असल्यामुळे नेट धरू शकत नाही, अलौकिक मान व स्तुती पाहून तो तेथे भुलून जातो. ।।१४।।


जनस्तुति लागे मधुर । 
ह्नणती उद्धरावया हा हरीचा अवतार । 
आह्मांलागीं जाहला स्थिर । 
तेणें घरी फार शब्दगोडी ॥१५॥

जगद्उद्धाराकरीता हा हरीचा अवतार असून आमच्याकरिता येथे स्थिर झाला आहे. इत्यादीजण स्तुतीचे शब्द त्याला गोड वाटू लागतात, त्यायोगे तो ‘शब्द’ गोडी धरतो. (ते गोड लागतात म्हणून तो अडकतो.) ।।१५।।


हा पांच विषयांमाजीं प्रथम । 
शब्दविषय संभ्रम । 
स्पर्शविषय सुगम । 
उपक्रम तो ऐसा ॥१६॥

पाच विषयामध्ये ‘शब्द’ हा पहिला विषय होय, त्या नंतर स्पर्श विषय त्याला सुगम होतो तो उपक्रम ऎक. ।।१६।।


नाना मृदु आसनें घालिती । 
विचित्र पर्यंक निद्रे प्रति । 
नरनारी शुश्रुषा करिती । 
तेणें धरी प्रीति स्पर्शगोडी ॥१७॥

बसायला लोड,तक्के,
गाद्या वगैरे मऊ आसने घालतात,
निजायला छप्पर पलंग वगैरे देतात आणि नरनारी शुश्रूषा सेवा करायला लागतात,
त्यायोगे तो ‘स्पर्श’ गोडी धरतो. ।।१७।।


रुपविषय कैसा गोंवी । 
वस्त्रें भूषणें देती बरवीं ।
तेणें सौदर्य करी जीवीं । 
देहभावी श्लाध्यता ॥१८॥

आता ‘रूप’ विषय कसा गोवतो ते पहा.
त्याला चांगली चांगली वस्त्र व अलंकार देतात.
त्यायोगे देहाच्या सौंदर्यात तो गुरफटतो.
देहभावात श्लाघ्यता (मोठेपणा, डौल, थोरवी) मानतो.
यामुळे देहाबद्दल मोठेपणा उत्पन्न होतो व वाढतो. ।।१८।।


रुपविषय ऐसा जडला । 
रसविषय कैसा झोंबला । 
जें जें आवडे तें तें याला । 
गोड गोड अर्पिती ॥१९॥

या प्रमाणे ‘रूप’ विषय त्याला जडतो.
त्यानंतर ‘रस’ विषय कसा झोम्बतो पहा.
जे जे खाणे आवडते,
तसले पदार्थ त्याला खावयाला देतात. ।।१९।।


ते रस गोडीकरितां । 
घडी न विसंबे धरी ममता । 
मग गंध विषय ओढितां । 
होय तत्त्वतां त्या कैसा ॥२०॥

त्या रसगोडीमुळे तो त्या भक्तांना घडीभरही न विसंबत त्यांची ममता धरून राहतो ! त्यानंतर ‘गंध’ विषय त्याला कसा ओढतो ते पहा. ।।२०।।


आवडे सुमनचंदन । 
बुका केशरविलेपन । 
ऐसे पांचहि विषय जाण । 
जडले संपूर्ण सन्मानें ॥२१॥

त्याला अत्तर, गुलाब, बुका, केशराची उटी इत्यादी लावतात. याप्रमाणे पाचही विषय सन्मानाने जडून राहतात.! ते सन्मानाने (मिळतात) त्यांचे बरोबर मानही मिळतो. ।।२१।।


मग जे जे जन वंदिती । 
तेचि त्याची निंदा करिती । 
परि अनुताप नुपजे चित्तीं । 
ममता निश्चिति पूजकांची ॥२२॥

असे झाले म्हणजे पूर्वी जे जे लोक वंदन करीत असत,
ते ते नंतर निंदा करू लागतात !
परंतु चित्तात अनुताप उत्पन्न होत नाही,
कारण त्याला पूजकाची ममता लागून राहिलेली असते. ।।२२।।


म्हणाल विवेकी जो आहे । 
त्यासी जनमान करील काये । 
हें बोलणें मूर्खाचें आहे । 
जया चाड आहे मानाची ॥२३॥

कोणी म्हणतील, जो विवेकी असतो त्याला जनमान( लोकांकडून मिळणारा मोठेपणा) कसा बाधा करील? परंतु हे बोलणे मूर्खाचे होय, ज्याला मानाची गोडी असते. (तोच असे म्हणेल.) ।।२३।।


ज्ञात्यासि प्रारब्धगति । 
मान झाला तरी नेघो म्हणती । 
परि तेथेंची गुंतोनि न राहाती । 
उदास होती तात्काल ॥२४॥

ज्ञात्याला (विवेकी पुरुषाला) प्रारब्ध गतीने मान प्राप्त झाला तरी (देणार्याच्या संतोषाकरिता) नको म्हणत नाहीत, परंतु त्यातच ते गुंतून राहत नाही, लगेच उदास होतात. ।।२४।।


या परी साधकाच्या चित्ता । 
मान गोडी न संडे सर्वथा । 
जरी कृपा उपजेल भगवंता । 
तरी होय मागुता विरक्त ॥२५॥

याप्रमाणे साधकाच्या चित्ताला मानाची गोडी सोडवत नाही. भगवंताला कृपा उत्पन्न होईल, तरच तो पुन्हा विरक्त होईल. ।।२५।।


तो विरक्त कैसा म्हणाल । 
जो मानलें सांडी स्थळ । 
सत्संगी राहे निश्चळ । 
न करी तळमळ मानाची ॥२६॥

तो विरक्त कसा वागतो म्हणाल, तर जिकडे मान-पान होतो, ते ठिकाण सोडून मनाची तळमळ टाकून देऊन तो सत्संगात राहू लागतो. ।।२६।।


ऐसा परमार्थ साधकासी ।
जन मान्यता विघ्न त्यासी ।
तेणें लुब्धा विषयासी ।
या चिन्हासी बोलिजे ।।२७॥

साधक असा परमार्थ करीत असतांना जनमान (लोकांकडून) ज्या विषयाचे विघ्न येतात, त्याचीच खूण आता सांगेन. ।।२७।।


मांडीना स्वतंत्र फड । 
आंगा येईल अहंता वाढ । 
न धरी जीविकेची चाड । 
न बोले गोड मनधरणी ॥२८॥

अभिमान उत्पन्न होईल या भीतीने तो स्वतंत्र फड म्हणजे संप्रदाय उभारीत नाही ! उपजीविकेची इच्छा धरून लोकांची मनधरणी करण्याकरिता तो गोड बोलत नाही. ।।२८।।


नावडे प्रपंचीं बैसणें । 
नावडे कोणांशीं बोलणें । 
नावडे योग्यता मिरविणें । 
बरवें खाणें नावडे ॥२९॥

त्याला प्रपंची लोकांत बसणे आवडत नाही, त्याला लोकांचे बोलणे रुचत नाही, आपली योग्यता मिरवावी असे त्याला वाटत नाही, किंवा गोड गोड खानेही आवडत नाही. ।।२९।।


नावडे लौकिक परवडी । 
नावडती लुगडी लेणी । 
नावडे परान्नगोडी । 
द्रव्यजोडी नावडे ॥३०॥

इतर लोकांसारखी चांगले चांगले कपडे, दागिने त्याला आवडत नाही, पंचपक्वनांची गोडी व धन जोडीही त्याला आवडत नाही. ।।३०।।


नावडे स्त्रियांत बैसणें । 
नावडे स्त्रियांचें रगडणें । 
नावडे स्त्रियांतें पाहणें । 
त्यांचें बोलणे ॥३१॥

स्रियांमध्ये बसणे आवडत नाही, स्रियांकडे पाहणे आवडत नाही, स्रियांकडून पाय वैगरे चेपून (रगडणे) घेणे आवडत नाही किंवा त्यांच्याकडे त्याला बोलणेही आवडत नाही. ।।३१।।


नको नको स्त्रियांचा सांगत । 
नको नको स्त्रियांचा एकांत । 
नको नको स्त्रियांचा परमार्थ । 
करिती आघात पुरुषासी ॥३२॥

नको नको ती स्त्रीयांची संगत, नको नको स्त्रीयांचा एकांत, नको नको स्त्रीयांचा परमार्थ, कारण तो पुरुषाला बाधकच होतो. ।।३२।।


म्हणाल गृहस्थ साधकें । 
स्त्रियां सोडून जावें कें । 
येच अर्थी उत्तर निकें । 
ऐक आतां सांगेन ॥३३॥

हे ऐकून, कोणी म्हणतील, की गृहस्थाश्रमी साधकाने स्त्रीला सोडून द्यावी की काय? ह्या बद्दलचे उत्तर सांगतो ते नीट ऐकावे. ।।३३।।


तरी स्वस्त्रीवांचोनि । 
नातळावी अन्यकामिनी । 
कोणे स्त्रियां सन्निध वाणी । 
आश्रयो झणीं न द्यावा ॥३४॥

तशा गृहस्थ साधकाने आपल्या स्त्री वाचून इतर स्रियांना स्पर्श करू नये, इतर स्रियांना आपल्याजवळ बोलण्याचीही संधी देऊ नये. ।।३४।।


स्वस्त्रीसहि कार्यापुरतें । 
पाचारावें स्पर्शावें निरुतें । 
परी आसक्त होऊनिया तेथें । 
सर्वथा चित्तें नसावें ॥३५॥

स्वस्त्रीकडे सुद्धा कामपूरतेच बोलावे व शिवावे,
पण मनाने तिच्याकडे बिलकुल आसक्त होऊन राहू नये. ।।३५।।


नरनारी शुश्रुषा करिती । 
भक्ति ममता उपजविती । 
परी शुद्ध जो परमार्थी । 
तो स्त्रियांचे संगती न बैसे ॥३६॥

स्त्रीपुरुष मंडळी सुश्रुषा करितात, भक्ती ममता उपजवितात, परंतु जो खराखुरा पारमार्थि असतो तो स्रियांच्या संगतीत बसत नाही. ।।३६।।


अखंड एकांतीं बैसणें । 
प्रमदासंगें न राहाणें । 
जो निःसंग निरभिमानें । 
त्याचे बैसणें सर्वदा ॥३७॥

तो अखंड एकांतात बसतो, तरुण स्रियांच्या संगतीस राहत नाही, निःसंग व निरभिमान अशा पुरुषांच्या जवळच बसत व वसत (राहत) असतो. ।।३७।।


कुटुंब आहाराकरणें । 
अकल्पित न मिळे तरी कोरान्न करणें । 
ऐसें स्थिति जें वर्तणें । 
तें जाणणें शुद्ध वैराग्य ॥३८॥

कुटुंबाच्या निर्वाहाकरिता अकल्पित काही न मिळाले, तर कोरान्न (कोरडी) भिक्षा मागावयाची, अशा स्थितिने वर्तन करणे, हेच शुद्ध वैराग्य समजावे. ।।३८।।


ऐसी स्थिति नाही ज्यांसी । 
तंव कृष्णप्राप्ति कैची त्यासी । 
यालागी कृष्णभक्तिसी । 
ऐशी स्थिति असावी ॥३९॥

अशी स्थिती जोपर्यंत साधणार नाही, तो पर्यंत त्याला श्रीकृष्ण प्राप्ती कशी होणार ? ह्या करिता श्रीकृष्णभक्ताला अशी स्थिती प्राप्त झाली पाहिजे. ।।३९।।


या स्थितिवेगळा जाण । 
कृष्णीं मिले तो अज्ञान । 
तो सकळ मूर्खाचे अधिष्ठान । 
लटकें तरी आण देवाची ॥४०॥

अशी स्थिती प्राप्त झाल्याशिवाय जो श्रीकृष्ण स्वरूपात मिळून जाऊ म्हणे, तो अज्ञान व मूर्खाचा शिरोमणी समजावा ! हे खोटे वाटेल तर देवाची शपथ घेऊन हे मी सांगत आहे. ।।४०।।


हें बोल माझियें मतीचे । 
नव्हेति गा साचे । 
कृष्णें सांगितले उद्धवहिताचे । 
मी साच ते बोलिलों ॥४१॥

हे बोलणे खरोखर माझ्या मतीचे नव्हे, श्रीकृष्णाने उद्धवाला जो हिताचा उपदेश केला आहे तोच मी सांगितला आहे. ।।४१।।


साच न मानी ज्याचें मन । 
तो विकल्पी न पवे कृष्णचरण । 
माझें काय जाईल जाण । 
मी बोलोन उतराई ॥४२॥

हे ज्याच्या मनाला खरे वाटणार नाही, तो विकल्पामुळे श्रीकृष्णचरणाकडे पोचणार नाही. यात माझे काय जाईल? मी तर सांगून उतराई होत आहे. ।।४२।।


साधावया वैराग्यज्ञान । 
मनुष्यदेही करावा प्रयत्न । 
सांगे एका जनार्दन । 
आणिक प्रयत्न असेना ॥४३॥

वैराग्य व ज्ञान साध्य करून घेण्याकरिता मनुष्य देहात येऊन वर सांगितल्या प्रमाणे प्रयत्न केला पाहिजे, त्या शिवाय दुसरा उपाय नाही, असे श्रीजनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज सांगत आहेत. ।।४३।।

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीगुरुचणारविंदार्पणमस्तु ।।